राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांनाही टेन्शन आलं आहे. पण आता या मुलांच्या आजी-आजोबांचीही परीक्षा होणार आहे. रविवारी 17 मार्चला ही परीक्षा होणार आहे.महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात ही परीक्षा होणार आहे.
ही परीक्षा कोणती आणि का होणार आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.केंद्र सरकारच्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी होणार आहे. रविवार 17 मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात ही परीक्षा होणार आहे.
राज्यात आतापर्यंत 6 लाख 20 हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. 5 लाखाहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील असा अंदाज आहे.केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. त्यामुळे नजीकच्या केंद्रावरच परीक्षा देण्यासाठी जावं. नोंदणीकृत असाक्षरांनी रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी त्या शाळेमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 05 या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी.