मुंबई, पुण्यासह राज्यातील १६ शहरांत उद्या मॉक ड्रिल

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. सीमेवरील घडामोडी आणि नवी दिल्लीत सुरु असलेल्या उच्चस्तरीय बैठका पाहता भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. भारताच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून प्रत्युत्तर मिळू शकतं. त्यामुळे भारतानंही तयारी सुरु केली आहे. शहरांवर हल्ला झाल्यास नागरिकांना त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी उद्या देशभरात मॉक ड्रिल (Mock drills) घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत.

युद्धाचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं देशभरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं उद्या (७ मे) रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. युद्धाच्या काळात हवाई हल्ल्याचा धोका असताना सायरन वाजवले जातात. तशाच प्रकारे उद्या सायरन वाजवला जाईल. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचायचं, ब्लॅकआऊट कसा करायचा, याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येईल.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. राज्य प्रशासनानं सगळ्या संबंधित यंत्रणांना अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्र्‍यांसह सगळ्या मंत्र्‍यांना प्रशासनाशी समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारनं मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणांचं तीन श्रेणीत वर्गीकरण केलं आहे.

पहिल्या श्रेणीत महत्त्वाची शहरं आहेत. यामध्ये देशभरातील १३ शहरं आहेत. मुंबई, उरण, तारापूर यांचा समावेश अ श्रेणीत करण्यात आलेला आहे. ब श्रेणीत देशभरातील तब्बल २०१ ठिकाणं आहेत. यामध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धताव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश आहे. तिसऱ्या श्रेणीत औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यात याआधी १९७१ मध्ये मॉक ड्रिल झालं होतं. त्यावेळी भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. त्यावेळी शहरांमध्ये सायरन वाजवण्यात आले होते. ब्लॅकआऊटचा अभ्यास करण्यात आला होता आणि लोकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आपत्कालीन स्थितीत काय करायचं याची माहिती नागरिकांना असावी यासाठी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येतं. जनजागृतीसाठी मॉक ड्रिल केलं जातं. युद्धाच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी कोणत्या कृती करायच्या, कोणत्या कृती टाळायच्या याची माहिती मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिली जाते.