अजित पवारांना धक्का! ‘घड्याळ’ चिन्ह बदलणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातफूट पडल्यानंतर अनेक महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह यावर दोन्ही गटांमध्ये वाद सुरु होता. अखेर बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ नाव आणि घड्याळ चिन्ह बहाल केले. तर शरद पवार गटाला तुतारी हे नवे चिन्ह दिले. मात्र याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या प्रकरणी सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच शरद पवारांचे फोटोही न वापरण्याची सूचना केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो तसेच घड्याळ चिन्ह वापरु नका, असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत.

सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा व छायाचित्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाही असं लेखी देण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार १८ मार्च रोजी होणार आहे.