आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा बांधवांनी पुन्हा अडवलं…..

सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा बांधवांनी पुन्हा एकदा अडवलं आहे. प्रणिती शिंदे यांना अडवून मराठा बांधवांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणाही मराठा बांधवांनी दिल्या.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावच्या मराठा बांधवांना अद्याप कुणबी दाखले न मिळाल्याची तक्रार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली. मराठा बांधवांच्या तक्रारीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदेनी थेट प्रांताधिकाऱ्याला फोन लावला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.आगामी लोकसभेच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी दौरे करत आहेत. यावेळी प्रणिती शिंदे यांचा ताफा पेनूर गावच्या मराठा बांधवांनी रस्त्यातच अडवला.

प्रणिती शिंदे यांनी देखील कारमधून बाहेर उतरुन मराठा बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्हाला कुणबी दाखले मिळत नसल्याची तक्रार मराठा बांधवांनी केली. प्रणिती शिंदे यांनी याबाबत विचारणा करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना फोन लावला. प्रणिती शिंदे यांनी प्रांताधिकाऱ्याशी बोलून मराठा बांधवांना कुणबी दाखले का मिळत नाहीयेत, अशी विचारणा केली.

यावेळी दोन दिवसात कुणबी दाखले मिळण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मराठा बांधवांना मिळाले आहे.दोन दिवसात कुणबी दाखले न मिळाल्यास वेगळ्या मार्गाने प्रयत्न करण्याचा इशारा देखील शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच कुणबी दाखले वाटप करायला स्वतः पेनूर गावात येणार असल्याचं आश्वासन देखील आमदार प्रणिती शिंदे दिलं. यानंतर मराठा बांधवांनी देखील टाळ्या वाजवून प्रणिती शिंदे यांचे आभार मानले.