सोलापूर जिल्ह्यात २२ जानेवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतीत संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मंदिर व परिसराची स्वच्छता यावेळी केली जाणार आहे.
ग्रामपंचायतींनी स्वनिधी किंवा दानशुर व्यक्तींच्या मदतीने मंदिराला विद्युत रोषणाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने महास्वच्छता अभियानातून जिल्ह्यातील सर्व मंदिर व मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना विभागप्रमुख, गटविकास अधिकारी भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करतील. प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी निवडावा आणि त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन मंदिराच्या स्वच्छतेची पाहणी करावी.
ग्रामीण भागात स्वच्छता सप्ताहांतर्गत मंदिर व धार्मिक स्थळांची स्वच्छता उपक्रमाचाही समावेश आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणांचा सहभाग घेण्यात येत आहे.गावातील रस्ते, जिल्हा व तालुका मार्ग- रस्ते स्वच्छ करणे अपेक्षित आहे. तसेच गावातील सर्वच भागातील कचरा काढणे, गटारे व नाल्यांचे प्रवाह प्रवाहित करून त्याची स्वच्छ करावी.
सार्वजनिक शौचालये, प्रसाधन गृहांमध्ये स्वच्छता करुन निर्जंतुकीकरण करावेत, सार्वजनिक भिंती स्वच्छ करुन त्यावर स्वच्छताविषयक कलात्मक संदेश टाकावेत, सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात जनजागृतीपर संदेश रेखाटावेत अशाही सूचना सीईओ आव्हाळे यांनी केल्या आहेत.