खानापूर घाटमाथ्यावरील बहुतांशी सर्व गावे ही डोंगराळ भागात विखुरलेली असल्याने त्यांचा समावेश डोंगरी भागात करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार शासनाने घाटमाथ्यावरील काही गावांचा समावेश केला. मात्र, खानापूर, सुलतानगादे, गोरेवाडी, रामनगर, जखीणवाडी, करंजे, पोसेवाडी या गावांचा समावेश न केल्याने येथील ग्रामस्थांत प्रचंड नाराजी पसरली आहे. गुरुवारी शासनाने बेनापूर, बलवडी (खा.), जाधववाडी, मेंगाणवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द, हिवरे, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, भडकेवाडी, धोंडेवाडी ही गावे डोंगरी भागात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना अनेक शिक्षण सवलती मिळून या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे; परंतु संपूर्ण घाटमाथा हा डोंगरी विभागात समाविष्ट होणे गरजेचे असताना शासनाने हा दुजाभाव कोणत्या निकषांच्या आधारे केला, अशी विचारणा होऊ लागली आहे. डोंगरी भागामध्ये समावेश न केल्याबद्दल लोकांबद्दल प्रचंड नाराजी दिसून येत आहे. डोंगरी भागात करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.