लोकसभेत थेट सांगलीत येऊन उमेदवारीची घोषणा करून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली होती. परंतु विधानसभेला आठपैकी एकही मतदारसंघ उद्धवसेनेला अद्याप मिळाला नाही. खानापूर आणि मिरज पैकी एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार प्रयत्नशील दिसतात. महाआघाडी कडून मिरजेची जागा मिळवण्याची सध्यातरी शक्यता निर्माण झाली आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी जिल्हात विधानसभेला शिवसेनेचा भगवा दोन वेळा फडकवला. पक्षफुटीनंतर ते शिंदे सेनेत दाखल झाले.
उद्धवसेनेत बरीच जुनी मंडळी कार्यरत आहेत. लोकसभेला सांगलीच्या जागेवर दावा करत थेट उद्धव ठाकरे यांनी मिरजेत येऊन घोषणा केली. जागा पदरात पाडून घेतली त्यामुळे येथे संघर्ष झाला. जागा मिळवली तरी अपक्ष राहून विशाल पाटील व समर्थकांनी खरी जागा काँग्रेसची होती हे दाखवून दिले.
लोकसभेला जागा मिळवण्यात बाजी मारली तरी विधानसभेला आठ पैकी एक तरी जागा मिळेल अशी शक्यता आहे. उद्धवसेनेची जिल्ह्यात ताकद टिकून ठेवण्यासाठी जागा आवश्यक असल्यामुळे पदाधिकारी अद्याप आशावादी आहेत. लोकसभेत जागा मिळवण्यात उद्धव सेनेने बाजी मारली तरी यंदा विधानसभेला आठ पैकी एक जागा पदरात पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार केला जात असल्यामुळे उद्धवसेनेला पहिल्या टप्प्यात एकही जागा जिल्ह्यात मिळवता आली नाही. पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत सुरुवातीला सांगली, मिरज आणि खानापूर मतदारसंघावरील दावा सोडू नये अशी मागणी केली. खासदार राऊत यांनी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.