आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळतच आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयीच्या चर्चांना उधान देखील आलेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सक्षम उमेदवारच मिळत नसल्याने सलग दोन टर्म आमदार असलेला खानापूर विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला स्वतःहून सोडण्याची नामुष्की पक्षावर आलेली आहे.
खानापूर मतदारसंघातील दिग्गज नेते माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला उमेदवारीसाठी मुलाखती दिल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार असण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाराष्ट्रातला उद्धव ठाकरेंचा हा एकमेव मतदारसंघ असेल ज्या ठिकाणी सलग दोन टर्म आमदार असताना देखील शिवसैनिकांनी आम्हाला उमेदवारी नको म्हणून मागणी केली असेल. उद्धव ठाकरेंचे लढणारे शिवसैनिकच ढेपाळल्यामुळे खानापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाला सोडण्यावर निश्चित होणार असल्याचे चित्र आहे.