इस्लामपूर (ता. वाळवा ) येथील व्यापाऱ्याला खंडणीसाठी पुलाची शिरोलीत मारहाण करण्यात आली.याप्रकरणी राहुल शहाजी सातपुते व रोहित शहाजी सातपुते (दोघेही रा. विलासनगर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल होत असल्याची माहिती समजताच संबंधित संशयित पसार झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संदेश रमेश पांचाळ ( वय ३०, रा. हनुमान नगर, इस्लामपूर) याचे पुलाची शिरोलीत इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. राहुल आणि रोहित सातपुते हे दोघे भाऊ ऑगस्ट २०२३ ते सात मार्च २०२४ पर्यंत पांचाळ यांना पैशासाठी धमकी देत होते. या दोघांनी पांचाळ यांना वारंवार मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करत ८० हजार रुपये उकळले.
पुन्हा ७ मार्च २०२४ रोजी सातपुते बंधू पांचाळ यांच्या दुकानासमोर येवून दुकान चालू ठेवायचे असेल तर आम्हाला महिन्याला सात हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून पांचाळ यांना पुन्हा मारहाण केली. तसेच पांचाळ यांना त्यांचे आई-वडील आणि मुलांनाही भेटू दिले नाही. त्यानंतर पांचाळ यांनी इस्लामपुरात जाऊन फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली.असून हा गुन्हा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार शिरोली एमआयडीसी पोलिस सातपुते बंधूंचा रविवारी शोध घेत होते. पण ते दोघेही पसार झाले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस पथक विलास नगर, सावंत कॉलनी, कोरेगावकर कॉलनी इंगळीकर माळ येथे ठिय्या मारून होते. नातेवाईक, मित्र, शेजारी यांच्याकडे पोलीस माहिती घेत होते, पण त्यांचा ठावठिकाणा मिळू शकला नाही.