शिंदे गटाची 1 जागा मनसेला….

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमधून एकत्र निवडणुका लढतील. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यात शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. तिघात चौथा आल्यास महायुती मजबूत होणार की तिढा अजून वाढणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये जागांसाठी घासाघीस सुरु आहे. वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने 18 जागांची मागणी केली आहे. त्यातील 16 जागांवर शिंदे गट ठाम आहे. सध्या मनसे महायुतीत येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास त्यांना 2 लोकसभा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांना कोणाच्या वाट्यातून जागा करुन दिली जाणार? जागावाटपाचा तिढा कोणती दिशा घेतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.