उजनीचे पाणी उद्या बंधाऱ्यात पोचणार

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला असून अवघे दोन-तीन दिवस पुरेल इतकेच पाणी सध्या त्यात शिल्लक आहे. दुसरीकडे उजनीतून भीमा नदीद्वारे सोडलेले पाणी सोमवारी माचणूरच्या पुढे आले होते.बुधवारी (ता. २०) उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोचेल. पण, गढूळ पाण्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होवू शकतो.

सोलापूर शहराला सध्या औज बंधारा व उजनी धरणावरील सोलापूर- उजनी पाईपलाइनमधून पाणीपुरवठा होतो. सध्या शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.उजनी-सोलापूर पाईपलाइन दुरुस्तीमुळे काही भागातील तर औज बंधारा कोरडा पडल्यावर किंवा पाईपलाइन नादुरुस्त झाल्यावर काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.

दरम्यान, उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोचल्यावर पुढील ४५ ते ५० दिवस शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे. पण, मे महिन्यात पुन्हा एकदा सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार असून तीव्र उन्हाळ्यामुळे त्यावेळी अंदाजे सात टीएमसी पाणी लागू शकते.