कर्जासाठी तारण ठेवलेल्या ७ लाख ८० हजार १७५ रुपयांचे सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी हुपरीतील आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखाधिकारी सौ. अनिता सतिश फडतारे (रा. होळकरनगर, हुपरी) यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बँकेचे असिस्टंट मॅनेजर शिरीष सुभाण्णा आवटे ( वय ४९ रा. पट्टणकोडोली) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आप्पासाहेब नाईक ( दादा ) श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखेत तीन ग्राहकांनी कर्जापोटी आपल्याकडील ४० ग्रॅम वजनाच्या २.६० लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, ४५.२०० ग्रॅम वजनाच्या २ लाख ९३ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या तसेच ३४.९५० ग्रॅमच्या २ लाख २७ हजार १७५ रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या गहाण ठेवल्या होत्या. बँकेचे डेली ऑडीटर आर. बी. शिंपुकडे हे बँकेच्या रांगोळी शाखेत ऑडीटसाठी गेले असताना सोने तारण जिन्नसमधील तीन जिन्नस कमी असल्याचे आढळून आले.
याबाबतची माहिती शिंपुकडे यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयास दिली. त्यानुसार बँकेकडून फडतारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे दागिने गहाळ झाल्याचे सांगितले. त्यानंतर वेळ देऊनही फडतारे यांनी गहाळ दागिने बँकेत जमा न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि माने करत आहेत.