इचलकरंजीत वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर!

इचलकरंजी पाण्याचा प्रश्न तर गंभीर आहेच. त्यात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न देखील जोर धरू लागलेला आहे. हा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसून येत आहे. प्रशासनाकडून वारंवार कारवाई करून देखील नागरिकांना पार्किंगची शिस्त लावण्याचा प्रयत्न असफल ठरत आहे.

पार्किंगची शिस्त लावण्यासाठी सम विषम पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली पण वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याशेजारील जागेचाच पार्किंगसाठी सहारा घ्यावा लागतो. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना देखील त्याचा तोटा सहन करावा लागत आहे.

शाहू पुतळा रोडवरील भाग्यरेखा चित्रपट ग्रह शेजारील असलेल्या येस बँकेच्या शाखेने सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी आपला स्वतःचा बोर्ड लावून ही जागा बँकेसाठी राखीव ठेवली आहे. या इमारतीमध्ये इतर अनेक व्यावसायिक देखील व्यवसाय करतात. पण त्याला न जुमानता बँक प्रशासनाने वैयक्तिक बोर्ड लावून स्वतःसाठी जागा राखीव ठेवली आहे.

या रस्त्यावर रहदारी अधिक असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून देखील अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या नागरिकांवर वारंवार कठोर कारवाई करण्यात येते. पण या घटनेकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे आणि याचा त्रास हा वाहनधारकांना सोसावा लागत असल्यामुळे नागरिकांच्यातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.