अलीकडच्या काळामध्ये वाहतुकीची कोंडी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर कबनूर हे 50000 हून अधिक लोकसंख्येचे शहर आहे. येथील मुख्य चौकामधून कोल्हापूर तसेच राष्ट्रीय महामार्गाकडे जावे लागते. या चौकात आठ रस्ते एकत्रित येत असल्याने या चौकात नेहमीच वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे वाहनधारकांना थांबावे लागते. या मार्गावरून विविध साखर कारखान्याच्या उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रकाची वाहतूक होते.
चौकात रस्त्यालगत एक धार्मिक स्थळ असल्यामुळे दर्शनासाठीही या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. चौकामध्ये वाहतूकीची मोठी समस्या उभी आहे. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीची कोंडी संपुष्टात येईल. याचप्रमाणे हातकणंगले आणि जयसिंगपूर बसस्थानक जवळूनही मोठी वाहतूक होत असते. या दोन्ही शहरातही वाहतुकीचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे या ठिकाणीही उड्डाणपूल उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण दत्तात्रेय दंडगे यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
