येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अरुण बालाजी नागरगोजे (वय ३८, मुळ रा. पोटोडा खुर्द, ता. जळकोट, जि. लातूर, सध्या रा. कुरुंदवाड) यांचे ड्युटीवर असताना ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज, शुक्रवारी सकाळी निधन झाले.
त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलिस ठाण्यासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.नागरगोजे गेल्या चार वर्षांपासून येथील पोलिस ठाण्यात नाईक पदावर सेवेत होते.
हेरवाड, अब्दुल लाट सारख्या संवेदनशील गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती. गुरुवारी रात्रपाळी असल्याने रात्री हेरवाड, अब्दुल लाट, शिरदवाड परीसरात पेट्रोलिंग करत होते. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस मुंबई येथील नियोजित बैठकीसाठी जाणार असल्याने नागरगोजे यांनी त्यांना पहाटे इचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सोडून आले होते .पोलिस ठाण्यात परतल्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते.
मात्र दवाखान्याच्या आवारातच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रथम त्यांच्या राहत्या घरी, त्यानंतर पोलिस ठाणे येथे काहीकाळ थांबवून त्यांच्या मुळ गावाकडे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई असा परिवार आहे.