हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून !आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ‘मविआ’कडून लढण्यासाठी माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. पक्षाकडून विचारणा झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसे याआधीच कळविले आहे.

ठाकरे यांनी देखील उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यावर पक्षाकडून रात्री अपरात्री किंबहुना केंव्हाही लढण्या बाबतचा निरोप आल्यास लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे व्यक्त केले आहे.

याचाच परिपाक म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘साहेब ! निष्ठवंताला उमेदवारी द्या, आम्ही रक्ताचे पाणी करून आपला उमेदवार निवडून आणू!’ अशी आग्रही मागणी हातकणंगले मतदारसंघातले शिवसैनिक करताना दिसतात. दरम्यान, दुखावलेल्या ‘मविआ’ नेत्यांमध्ये राजू शेट्टी यांच्याबाबत अविश्वासाची भावना निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत तातडीच्या बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे.यातूनच हातकणंगलेची निवडणूक ‘मशाल’ चिन्हावर लढण्याच्या मुद्द्याने उचल खाल्ली आहे. नव्याने चर्चेत गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी कोल्हापूर सोडून इतरत्र लढण्यास नकार दिल्याने शाहूवाडीचे माजी आ. सत्यजित पाटील यांना उमेदवारीची गळ घातली जाण्याची शक्यता बाळावल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पाटील यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, ‘हातकणंगलेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे मीही याआधीच सकारात्मकता कळवली आहे. यावर ‘मविआ’मध्ये एकमत झाल्यास आणि पक्षाकडून रात्री अपरात्री, केंव्हाही लढण्याबाबतचा निरोप आल्यास लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच केले आहे