नीरा उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू मात्र….

नीरा उजव्या कालव्यातून सध्या पंढरपूर भागात उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन (पाणी) सुरू आहे. सिंचन सुरळीतपणे पार पाडावे, अशी मागणी शेतकऱयांची आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडूनच ‘टेल टू हेड या नियमाला तिलांजली दिली जात आहे.

पाणी टेलच्या शेतकऱयांकडे पूर्ण क्षमतेने जाणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. कालव्यालगतचे शेतकरी अधिकाऱयांना हाताशी धरून रात्री-अपरात्री दारे उघडून पाणी नेत आहेत. त्यामुळे सिंचनात विस्कळीतपणा येत आहे. उन्हाळय़ाची परिस्थिती असल्याने पाण्यासाठी शेतकऱयांमध्ये वादावादी सुरू आहेत.

उन्हाळी हंगामातील पिकांना नीरा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, उन्हाळ्याची परिस्थिती पाहता, अधिकाऱयांना प्रत्यक्ष जागेवर उभे राहून पाणी शेतकऱयांना देणे गरजेचे आहे. कारण पाण्यासाठी शेतकरी भांडण करू लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मात्र, अद्यापि पंढरपूर ग्रामीण, तसेच तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक यांचे पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पाणीवाटपात विस्कळीतपणा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.