हातकणंगलेत आता तिरंगी लढत! ठाकरेंनी टाकला डाव

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हातकणंगले मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यानंतर मात्र भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. यामुळे या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत.

त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने-शेट्टी-आवाडे अशी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, राहुल आवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तशी तयारी देखील केल्याची माहिती समोर आली आहे.कोल्हापूरचे शिवसेना संपर्क नेते संजय पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. त्या भेटीत निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांना लवकरच आवडे भेटणार आहेत. यामुळे कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. यामुळे राजू शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता देखील तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल.