भिकमागो आंदोलनावर विरोधक ठाम

आळते (ता. हातकणंगले)  येथे चोरटे दिवसाढवळ्या सलग घरफोड्या करून लोकांची संपती लुटून नेण्याचे धाडस करत असल्याने असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलीस दल सर्तक झाले आहे. ग्राम पंचायतीने ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्राम सुरक्षा दल तयार करावे, सीसीटीव्ही कॅमेरे गावात बसवावेत, दवंडी देऊन जन जागृती करावी अशा सुचना पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी ग्रामपंचायतीस दिल्या आहेत.

 ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या बैठकीस सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील रियाज मुजावर, विरोधी गटाचे नेते जावेद मुजावर उपस्थित होते. दरम्यान, ग्रामपंचायतीमधील विरोधी गटाच्या सदस्यांनी सरपंच यांच्या कारभारावर गंभीर आरोप करून सोमवारी २१ जुलैला सायंकाळी ४ वाजता गावात भिकमागो आंदोलन करून जमलेल्या पैशातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा इशारा दिला असून याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले असून ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी निधीची उपलब्धता कशी करते ? याकडे गावाचे लक्ष लागून राहिले आहे..