आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा उमेदवार निवडणुकीत (Maratha Candidate) उतरवण्याच्या भूमिकेवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा उमेदवारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा समाजाने उमेदवार देण्याबाबत घेतलेल्या बैठकीचा अहवाल जरांगे यांच्याकडे दिला जाणार आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करायचे का? कोणत्या जिल्ह्यात कुणाला उमेदवारी द्यायची, अन्यथा लोकसभा निवडणूकच लढवायची नाही याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मनोज जरांगे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आंतरवाली सराटीत आयोजित केली आहे.
सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाच्या बैठकीत शुक्रवारी झालेल्या राड्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.