नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे बुधवारी म्हणजेच २४ एप्रिलला ग्रामदैवत हनुमान यात्रेचे आयोजन केल्याची माहिती श्री हनुमान यात्रा समिती संयोजक व माजी सरपंच प्रकाश देशमुख यांनी दिली. आज मंगळवारी भजन, हरिजागर, हनुमान जन्मकाळ सोहळा, सुंठवडा, बुधवारी यात्रा मुख्य दिनी पहाटे काकड आरती, पूजाभिषेक, आदी धार्मिक कार्यक्रम होतील.
सायंकाळी गावगाडामधून पारंपरिक वाद्ये, धनगरी ढोल वाद्यात ‘श्रीं’च्या प्रतिमेची गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक, हनुमान मंदिरासमोर रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे. यंदा यात्रेवर लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे सावट असल्यामुळे कुस्ती मैदान, मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत. यात्रा पार्श्वभूमीवर सध्या मंदिर परिसरात मेवामिठाई, लहान मुलांसाठी खेळण्यांचे स्टॉल्स, पाळणेवाल्यांचे आगमन होत आहे. गुरुवारी २५ तारखेला यात्रेची सांगता होणार आहे.