चंदूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीची घरफाळा व पाणीपट्टीची १ कोटी ७१ लाखांची थकबाकी असून वसुलीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.चंदूर ग्रामपंचायतीची मिळकतधारकांकडून मागील घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी १ कोटी ४७ लाख असून चालू वर्षाची थकबाकी ८४ लाख, अशी २ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ६० लाखांची वसुली झाली आहे. १ कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. ग्रामपंचायत कर्मचारी वसुलीसाठी दररोज मिळकतधारकांच्या घरी जात आहेत. त्यास ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत नाही.
यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांवर याचा परिणाम होत आहे. उत्पन्न नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती, वीज बिल थकबाकी भरणा आदींसाठी विलंब होत आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली हा सर्वच ग्रामपंचायतींना भेडसावणारा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी मुदतीत घरफाळा व पाणीपट्टी कर भरणा करून प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांना विविध सुविधा व योजना कर भरण्यासाठी साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक भरणा असे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुढील वर्षापर्यंत थकबाकी शंभर टक्के वसूल होण्यासाठी आतापासून प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक विभागामध्ये घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.