उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ३७ टक्क्यांवर आहे. सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून महापालिकेने धरण परिसरात एक कोटींचा खर्च करून दुबार पंपिंग सुरू केले आहे. पण, झपाट्याने खालावत असलेल्या पातळीमुळे उणे ५५ टक्क्यांवर तिबार पंपिंग सुरू करावे लागणार असून, त्यासाठी दोन कोटींचा खर्च आहे.यंदा पाऊस लांबल्यास धरणातील साठा उणे ६० टक्क्यांखाली गेल्यास सोलापूरचा पाणीपुरवठा १०-१२ दिवसाआड होऊ शकतो, अशी चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण मदार उजनी धरणावरच अवलंबून आहे. शेतीसाठी कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडता येणार नाही, एवढी धरणाची पातळी खालावली आहे. याशिवाय इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेड या नगरपालिकांसह १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनाही उजनीचाच आधार आहे.पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह औद्योगिक वसाहतींनाही उजनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, धरण उणे ६१ टक्के झाल्यानंतर धरणावरील ४७ पैकी बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडतात. आतापर्यंत धरण २०१५-१६ मध्ये उणे ६० टक्क्यांपर्यंत खाली गेले होते, पण पाऊस कमी पडल्याने यंदा स्थिती चिंताजनक आहे. धरणातील साठा उणे ६० टक्क्यांवर पोचल्यास कोट्यवधींचा खर्च करूनही सोलापूर महापालिकेला दहा दिवसाआड पाणी देता येणार नाही. मेनंतर नदीतून पाणी सोडता येणार नाही आणि जलवाहिनीतूनही पाणी उपसा करण्यास अडचणी येतील, अशी सद्य:स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सध्यातरी पाणी जपून वापरण्याचाच पर्याय नागरिकांकडे शिल्लक आहे.