एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सरकारला चांगलेच सुनावले आहे.वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती नसती असे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जरा इकडेही पहावे!
सांगली, सातारा व सोलापूरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले आहे. दिवसेंदिवस ही स्थिती बिकट होत चालली आहे. विहिरी – तलावांनी तळ गाठला आहे. सांगली जिल्ह्यात टँकरची मागणी १३%नी वाढली आहे. वारणा धरणात केवळ २३% पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे तर मे मध्ये काय परिस्थिती असणार? मान, खटाव, आटपाडी, जत कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा या गावातील तलाव काही काळातच कोरडे पडणार आहेत. पाण्याविना जगायचं कसं? शेती करायची कशी? इतक्या गंभीर मुद्द्याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी आधीच धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.