नव्या मुंबई-पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्गाचे काम महिनाभरात होणार सुरू

सातारा, सांगली आदी दुष्काळी भागाला लाभ होण्यासाठी मुंबई ते पुणे – बंगळूर असा 60 हजार कोटींचा नवीन द्रुतगती महामार्ग करणार आहोत. जेएनपीटी चौक ते शिवडी या भागाचा डीपीआर पूर्ण झाला आहे.याचे दहा हजार कोटी रुपयांचे पहिले काम महिनाभरात सुरू होणार आहे.

उर्वरित पन्नास हजार कोटींची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय रस्ते महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रकल्पांचे भूमिपूजन व कोनशिला समारंभात ते बोलत होते. येथील दहिवडी-मायणी-विटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-160 या रस्त्याची सुधारणा व काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मंत्री गडकरी यांच्याहस्ते झाले.

या रस्त्याची एकूण लांबी 52.70 किलोमीटर असून, त्याचा अंदाजे खर्च 632 कोटी रुपये आहे. यावेळी खासदार विशाल पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, राजाराम गरुड, माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल म. बाबर, सुहास बाबर, अविनाश चोथे, किशोर डोंबे आदी मान्यवर उपस्थित होते.