आभा कार्ड, आयुष्मान कार्ड यासह शासनाच्या विविध योजनांचे कार्ड मोफत काढून दिले जात आहे, मात्र या कार्डच्या आडोशाने येथे अनेकांची डी मॅट खाती काढली आहेत.नागरिकांना आपले डी मॅट खाते आहे, याची कल्पनाही नाही. परिणामी डी मॅट खाते मेंटेन ठेवण्यासाठी असणारी निर्धारित रक्कम न भरल्याने दंड स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची व्यक्त केली जात आहे.
इचलकरंजी औद्योगिक शहर असल्याने येथे कामगार वस्ती अधिक आहे. संसारात काहीशी मदत मिळावी यासाठी अधिकतर कामगारांमधील कुटुंब शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या या स्थितीचा फायदा घेत त्यांना शासनाच्या योजनांचे मोफत कार्ड काढून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या फसवणुकीचा प्रयत्न काही जणांकडून होताना दिसून येत आहे.
नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी अशी कार्ड काढणाऱ्यांवर नियंत्रण आवश्यक आहे.सर्वसामान्य नागरिकांना कल्पना न देता त्यांचे डी मॅट खाते काढण्यात येत आहे. अशा अनेक तक्रारी येत असून, नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने योजनांची कार्ड मोफत काढून देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अशी मागणी होत आहे.