अन्यथा होणार कारवाई………

लोकसभेची निवडणूक भयमुक्त व्हावी. निवडणुकीच्या प्रचारामध्ये वैयक्तिक टिकाटिप्पणी करू नये. सोशल मीडियावर सायबर विभागाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. जातीय तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही वादग्रस्त पोस्‍ट टाकू नये.

अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी दिला. हातकणंगले पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, एप्रिलमध्ये रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, महावीर जयंती, हनुमान जयंतीसारखे अनेक धार्मिक सण, सामाजिक उत्सव व जयंत्या साजऱ्या होणार आहेत. ते सर्व शांततेत व्हावेत. तसेच मिरवणुकीसह सर्व कार्यक्रमांसाठी रात्री दहापर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे.

पोलिस निरीक्षक अशोक सायकर म्हणाले, धार्मिक सणांच्या व जयंतीच्या मिरवणुका काढताना प्रत्येकाने पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. धार्मिकस्थळ अथवा मंदिरासमोर मिरवणूक रेंगाळू देऊ नये. मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर टाळावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.