लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघडीमध्ये जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. पण सांगली या एका जागेमुळे मविआतील घटकपक्षांत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. या जागेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी आतापर्यंत कित्येक बैठका पार पडल्या. मात्र अजूनही कोणताही पक्ष माघार घ्यायला तयार नाही. आम्हाला विश्वासात न घेताच उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, असा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान, एकीकडे हा वाद चालू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अचानकपणे भाजपच्या माजी आमदारी भेट घेतली आहे.
भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. त्यासाठी राऊत थेट जतमध्ये गेले होते. विलासराव जगताप हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी संजयकाका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विलासराव जगताप यांनी थेट विरोधही केला आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी विलासराव यांची भेट घेतली आहे.