देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. चीन भारतावर आक्रमण करेल, अशी भाकणूक बाळूमामा भंडारा उत्सव जागरदिनी कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी केली.श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरादिवशी पहाटे ही भाकणूक झाली. मराठी वर्षातील ही शेवटची अन् महत्त्वाची भाकणूक असल्याने काय भविष्य कथन होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध प्रदेशमधील भाविक उपस्थित होते.
यावेळी झालेली भाकिते अशी
कोरिया, चीन जगासाठी घातक ठरतील. भारत-पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. चीन भारतावर आक्रमण करेल. दुनिया पेटेल. काळरात्र येईल. सावध राहा. तिरंगा ध्वज आनंदात राहील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील.देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. नेते विकत मिळतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील.
उलथापालथ होईल. भ-ष्टाचार वाढेल. नेते तुंरुगात जातील. जातीय राजकारणाला ऊत येईल. नीतिमत्ता बाळगा. पाच बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्या. बाळूमामांचा त्रिभुवनात जयजयकार होणार. आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी हाय. आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईल. एकीने वागा. राजकारण करशीला तर माझ्याशी गाठ हाय. पिवळ्या भस्माचा महिमा आगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल. कोल्हापूरचेे राजघराणे क्षत्रिय वंशाचे हाय. धर्माची गादी हाय, तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील.
दागिने.. पैसे फुकाचे…
ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. तांबे, लोखंड मोलाचे होईल. शेतीचा भाव वाढेल. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल. माणूस कागदाचा घोडा नाचवेल. दागिने, पैसे फुकाचे होतील. वैरणीचा भाव वाढत जाईल. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढरे धान्य मोलाने विकेल.
नदीला कुलपे पडतील…
मनुष्य जंगलात जाईल. जंगलातील पशुधन गावात येईल. वाड्यावस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पहाल. पाऊस पाऊस.. पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. कर्नाटकातील जलाशयाला मोठे भगदाड पडेल. नदीला कुलपे पडतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील.