तुरीच्या दरात तेजी……

तुरीच्या दरात तेजी येत असल्याने तूरडाळीचे भाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. लग्नसराईमुळे तूरडाळीची मागणीही वाढत आहे. त्यामुळे दरवाढ होण्यापूर्वीच तुरीची डाळ घेऊन ठेवणे फायद्याचे ठरू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.सन २०२३ मध्ये मान्सून विलंबाने दाखल झाल्याने मूग, उडीदाप्रमाणेच तुरीचे प्रमाणही घटले होते. त्यातच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तूर पिकाला जबर फटका बसला होता.

परिणामी, तुरीची सरासरी आवक घटली. मागील आठवड्यापासून तुरीच्या बाजारभावातही तेजी दिसून येत आहे. या तेजीचा परिणाम म्हणून तूरडाळीच्या किमतीत वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे.सध्या लग्नसराई असल्यामुळे तूर डाळीची मागणीदेखील वाढली आहे. मागणीत अशीच वाढ होत राहिली आणि तुरीच्या भावात आणखी तेजी आली तर तूरडाळीचे भावदेखील वाढू शकतात, असे व्यापारी सांगतात.

सध्या तूरडाळ १५० ते १६० रुपयांच्या आसपास असून, यामध्ये १० ते १५ रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे मात्र जिल्ह्यातील महिलांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.