लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वपक्षीय उमेदवार आश्वासनांची खैरात असलेले साहित्य वाटप करीत आहेत. या प्रचार पत्रकांवर मुद्रक, प्रकाशक यांचे नाव असायला हवे.यात हयगय झाल्यास प्रिटिंग प्रेस मालकाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करू, असा इशारा जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिला आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रचार करताना नियमांचे उल्लंघन करू नका, असे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२७ क द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निबंध आहेत.
उमेदवाराने प्रत्येक पत्रक, हस्तपत्रक, घोषणा फलक किंवा भित्तिपत्रके लावण्यापूर्वी त्याची प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. यात आक्षेपार्ह मजकूर असतील तर आयोगाकडून तत्काळ हटविण्याचे निर्देश निवडणूक कार्यालयाच्या मीडिया सेलकडून दिले जातात.सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्स यांनी प्रचार साहित्य व इतर छपाईबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाची पथके दोन्ही मतदारसंघांत कार्यरत आहेत. कुठेही आचारसंहितेचा भंग होत असेल तर कडक कारवाई होणार आहे.