सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुतेंचा परभव केला आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु होती. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातच गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. विकास वाघमारे, सुदर्शन यादव व यतिराज होनमाने, श्रीमंत बंडगर अशी गोंधळ घातलेल्या युवकांची नावे आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा प्रकार घडला आहे. लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच ही बैठक आयोजित केली होती. दरम्यान गोंधळ सुरू होताच माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले होते. गोधळानंतर बंद दाराआड बैठक सुरु आहे.