जयंत पाटील यांची हातकणंगलेत कसोटी!

हातकणंगले मतदार संघातील वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघात होत असलेल्या चौरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कसोटी लागणार आहे.गतवेळी आघाडीत असलेल्या राजू शेट्टी यांना या दोन मतदार संघात मताधिक्य मिळाले होते. तसे मताधिक्य या दोन मतदार संघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील यांना मिळते का यावर आमदार पाटील यांचे या दोन मतदार संघावरील वर्चस्व ठरणार आहे. तसेच सांगलीमध्ये सुरू असलेल्या उमेदवारीच्या गोंधळाचा आणि खासदार संजय राउत यांनी शाब्दिक बाणामुळे दुखावलेला या मतदार संघातील वसंतदादा गट काय भूमिका घेतो यावर या दोन मतदार संघातील मतावर परिणाम होणार आहे.

आमदार पाटील यांचे शिराळा व वाळवा मतदार संघामध्ये वर्चस्व आहे. गेल्यावेळी शेट्टींना मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता हेच काम सेनेचे सत्यजित पाटील यांच्यासाठी करायचे आहे. बदलत्या स्थितीत शेट्टी आणि माने हे विरोधक असून शाहूवाडीच्या पाटलांसाठी त्यांना मताधिक्य मिळवून देत असताना आपले वर्चस्वही सिध्द करावे लागणार आहे. आणखी चार महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने आमदार पाटील यांच्यासाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे.