खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला खूपच मोठी परंपरा आहे. या निमित्ताने 200 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळविण्याचा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नागनाथांच्या नावाने चांगभलं च्या जयघोषाने संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली होती. गुढी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ झाला. गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्र येऊन लिंब खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर सर्व जाती-धर्मांचे लोक व मानकरी यांनी एकत्रित येऊन बगाडाच्या बांधणी केली. बगाड तयार झाल्यानंतर प्रत्येक गाड्यांना ग्रामस्थांच्या मदतीने ओढून मंदिराभोवती फिरवतात. बगाड पळविण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे, तालुक्यातील भाविकांच्या नवसाच्या सुमारे 250 बैलजोड्या बगाड पळविण्यासाठी दाखल झाल्या होत्या.