हुपरी शहरातील चांदी उद्योग आता ऑक्सिजनवर आहे. चांदीच्या दरात होत असलेली उच्चांकी वाढ झाल्याने ऐन लग्नसराईत दरवाढीचा फटका बसला आहे बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट असल्याने मालाची विक्री घटली परिणामी व्यापारी पेठेवर मागणीही घटली याचा थेट विपरीत परिणाम उत्पादनावर झाला आहे. आणि हजारो हातांचे काम थांबल्याने आता चांदी कारागीरावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोन्याचांदीचे दर गगनाला भिडले आहेत यामुळे मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे.
ग्राहक नसल्याने व भरीत भर म्हणून सातत्याने सोनेचांदीच्या दरात चढ़- उताराने प्रचंड मोठ्या प्रमाणात उसळी घेतली आहे. किलोचा दर पाऊण लाखावर पोहोचला आहे. महागाईच्या प्रचंड झळा जाणवत आहेत यामुळे ग्राहकांनी चांदीच्या दागिन्यांकडे पाठ फिरवली आहे. परिणामी कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. पारंपारीक पध्दतीने हुपरी शहरात तयार होत असलेल्या रुपाली गजश्री या पैंजणाची मागणी कमी झाली आहे. यामुळे हुपरी पंचक्रोशीतील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. वरवणे लावून घरातील नवरा बायको संसाराचा गाडा चालवत होते मात्र, आता हाताला काम नाही हाता तोंडाची गाठ पडणे मुश्किल झाली आहे. घरगाडा कसा चालवायचा या चिंतेने काही लोक रोजगाराच्या शोधात इतर शहराकडे जात आहेत. यामुळे चांदी व्यावसायिक अस्वस्थ आहेत.
हुपरी शहरासह परिसरातील यळगूड पट्टणकोडोली, तळंदगे, रेंदाळ, व जवळपास असणाऱ्याकर्नाटक राज्यातील मांगूर, कुन्नूर, आदी गावांमध्ये चांदी हस्तकला व्यवसाय पसरला आहे. चांदीचे दागिने बनविण्याच्या प्रक्रियेत असंख्य कारागिर यामध्ये आपला उदरनिर्वाह करत असून लाखो लोकांना यातून रोजगार मिळाला आहे. कितीतरी युवक काम करुन शिक्षण घेऊन पुन्हा- हाच व्यवसाय करतात.
देशभरातील सराफ व्यवसाय मागणीनुसार दागदागिने बनवून त्यांचा पुरवठा करण्याचे काम येथील उद्योजक करत असतात. सध्या चांदी उद्योगासमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी आहेत. सोने-चांदीतील चढ-उताराने बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत नाही. परिणामी म्हणावे तितके काम मिळत नाही. यामुळे सराफ बाजाराबरोबर या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांच्या रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
