खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील वेताळगुरू मंदिराचे पुजारी यांची मनमानी

खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील श्री वेताळगुरू मंदिराचे पुजारी विष्णू कृष्णदेव साळुंखे आणि कुटुंबीयांनी मंदिरात मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे साळुंखे यांना तेथून हटवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास मुळीक व ग्रामस्थांनी केली. याबाबत पत्रकारांसमोर भूमिका मांडताना मुळीक म्हणाले, आमचे श्रध्दास्थान असलेल्या वेताळगुरूचे पुजारी साळुंखे हे देवाची सेवा आठवड्यातून एक-दोन दिवसच करतात. पवित्र मंदिराच्या आवारात त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थी असलेली समाधी बांधून भाविकांची दिशाभूल चालविली आहे.

मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छेडछाड केली जात आहे. त्यामुळे त्यांची मंदिर परिसरातून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. भाजपचे सुखदेव ऐवळे म्हणाले, विष्णू साळुंखे हे श्री वेताळगुरूदेवाचे  स्वयंघोषित पुजारी आहेत. ग्रामस्थांसह भाविकांना दमदाटी केली जाते. देवस्थान हे खासगी मालमत्ता असल्यासारखे साळुंखे कुटुंबीय वागत आहेत. मंदिरात त्यांनी केलेली नातेवाईकांची समाधी तत्काळ हटवावी. यावेळी उपसरपंच तुकाराम मुळीक, शशिकांत मुळीक, शरद मुळीक, नामदेव मुळीक उपस्थित होते.