राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरविण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला वेळ लागला असला तरी उद्यापासून त्याची खरी रंगत पाहायला मिळणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगलेतून, तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी जवळपास मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली आहे.
महायुतीकडून उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्याने खऱ्या अर्थाने अजून प्रचाराला रंगत येणे बाकी आहे. त्यातच उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून कोण कोणते मल्ल निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे चित्र जवळपास 21 एप्रिलपर्यंत स्पष्ट होईल.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी (Kolhapur and Hatkanangle Lok Sabha constituencies) शुक्रवारपासून (ता. 12 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.
महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार सोमवारी 15 आणि मंगळवारी 16 रोजी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उपस्थिती निश्चित मानली जात आहे.