महाराष्ट्रात लोकसभेच्या रणसंग्रामात माढ्याचा विषय प्रचंड गाजतोय. माढ्याच्या राजकारणात पडद्यामागे अफाट घडामोडी घडत आहेत. या घडामोडींचा आपण अंदाजही लावू शकणार नाहीत इतक्या वरिष्ठ पातळीवर राजकीय घटना घडत आहेत. माढा लोकसभा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा ताकद आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात या मतदारसंघात सातत्याने राजकीय संघर्ष बघायला मिळालेला आहे. त्यामुळे हे राजकीय वैर इतक्या सहजासहज संपणार नाही. विशेष म्हणजे स्वत: रणजितसिंह निंबाळकर यांनी हे मान्य केलं आहे. पण ‘उम्मीद पे हैं दुनिया कायम’ या हिंदी म्हणीप्रमाणे भाजपला अजूनही आशा आहे.
विशेष म्हणजे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील पुढच्या दोन दिवसांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये मोठी दुफळी निर्माण झालेली बघायला मिळाली आहे. ही दुफळी फक्त भाजपमध्येच नाही. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे. काँग्रेस माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे बडे नेते रामराजे निंबाळकर यांनी उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केला आहे. त्यांनी भाजपला उमेदवार बदलण्याची विनंती केली आहे. त्यामुळे माढ्यात सत्ताधारी महायुतीतचं मोठी गुंतागुंत बघायला मिळत आहे. ही गुंतागुंत सोडवण्यासाठी आता रणजितसिंह निंबाळकर स्वत: राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत.
रणजितसिंह निंबाळकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांनीदेखील फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीत माढ्याच्या जागेवर अवांतर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे माढाच्या जागेवर राष्ट्रवादीकडून मदत मिळाली नाही तर बारामतीत भाजपकडून राष्ट्रवादीला मदत केली जाणार नाही, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चेवर बैठकीनंतर राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या बैठकीनंतर राहुल कुल आणि रणजितसिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.