कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करूनही भाजपसह सर्वांची नाराजी, तसेच कोल्हापूर मतदारसंघात खासदार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जनतेमध्ये असलेला नाराजीचा सूर पाहता, महायुतीच्या या दोन्ही जागा सपशेल धोक्यात आल्या आहेत.आपल्याच पक्षातील उमेदवारांचे ‘डॅमेज कंट्रोल’ रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात येऊन रात्री उशिरापर्यंत तळ ठोकावा लागला.
दुपारी तीनच्या सुमारास दाखल होताच शिंदे यांनी येथील एका हॉटेलमध्ये तब्बल पाच तासांहून अधिक काळ बंद खोलीत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), तसेच बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली. हातकणंगलेचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मिंधे गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांची अडचण वाढली आहे.
आवाडे यांच्यासह आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी सर्वाधिक वेळ चर्चा झाली. आवाडे शेवटपर्यंत निवडणूक लढविण्यावर ठाम होते. याशिवाय भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मिंधे गटाचे दोन्ही उमेदवार उपस्थित होते. रात्री साडेआठपर्यंत मुख्यमंत्री नाराजांची समजूत काढण्यात व्यस्त होते. दरम्यान, यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये सोडले जात होते; पण पत्रकारांना गेटच्या बाहेर रोखले होते.