कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत दिली आहे परंतु पाणी पातळीत म्हणावी तशी घट होत नसल्याने जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांमधील २१ हजार हेक्टर पिकाऊ शेती पूर्णपणे पुरात बुडाली आहे.यात ऊस, भात, सोयाबीन पिके गुदमरत आहेत. आणखी काही दिवस पुराचे पाणी ओसरले नाही, यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी काही वर्षे मागे ढकलला जाण्याची शक्यता आहे. पावसाने सात ते आठ दिवसांपासून नदीकाठच्या शेतात पुराच्या पाण्यात घुसमटणाऱ्या पिकांना वाचवणे मुश्कील झाले आहे. सुरळीत पाणी गेल्याने आणाखी काही दिवस उसाचे पीक पाण्यात राहिल्यास त्यांचा पाला कुजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीकाठीच बसून पुराचे पाणी कमी होते का हे पाहण्याशिवाय पर्याय नाही.
पंचगंगा नदी तिरावर असणाऱ्या करवीर, गगनबावडा, हातकणंगले, शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला आहे. दूधगंगा, कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने हजारो हेक्टर पिकाऊ शेती आपल्या कवेत घेतली आहे.
याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी कृषी अधिकारी अजय कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टीने पूर आला आहे. या पुरात ३०० हून अधिक गावांतील वीस हजार हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी कमी होताच पंचनामा केला जाणार आहे. या शेतात भात, सोयाबीन, ऊस अशी पिके आहेत. पाणी कमी झाल्यानंतरच त्या पिकांची स्थिती समजणार आहे.