गर्भलिंग निदानाच्या गोळ्या देणाऱ्या बनावट डॉक्टर आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर गर्भलिंग निदान करणाऱ्या दोघांना आज पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या फुलेवाडी, जोतिबा डोंगर (वाडीरत्नागिरी) येथील क्लिनिकवर, तर बुधवार पेठ, डिसाळ गल्लीतील लॅबोरेटरीवर छापा टाकला. कारवाईत बनावट डॉ. दगडू बाबूराव ऊर्फ डी. बी. पाटील (वय ४५, रा. देवकर पाणंद, मूळ पुलाची शिरोली, ता. हातकणंगले), सोनोग्राफी मशीन चालवणारा गजेंद्र ऊर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (३७, रा. शिरसे, ता. राधानगरी) आणि लॅबोरेटरीचा मालक बजरंग श्रीपती जांभिलकर (३१, रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. महापालिका, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. कारवाईत बनावट डॉक्टरकडे फुलेवाडीतील ‘प्रतीक्षा’ क्लिनिकमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिळाल्या.
जोतिबा डोंगर परिसरातील क्लिनिकमध्ये सलाईन, पुरुषार्थ वाढविणाऱ्या गोळ्या यासह अन्य औषधे मिळाली. जुना बुधवार पेठेतील लॅबोरेटरीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह संशयित मिळाले. पथकाच्या कारवाईत भक्कम पुरावे मिळाल्याचे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध समितीच्या गीता हासूकरकर यांनी सांगितले.