विशाल पाटील उद्या करणार अर्ज दाखल……

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) मंगळवारी (ता. १६) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अपक्ष आणि काँग्रेसतर्फेही अर्ज दाखल करतील.येथील गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून सकाळी साडेनऊ वाजता पदयात्रा सुरू होईल. काँग्रेस कमिटीसमोर मेळाव्यात रूपांतर होईल. त्यानंतर मोजके लोक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील.

महाविकास आघाडीने सांगली मतदारसंघ शिवसेनेला (Shiv Sena) सोडला आहे. मात्र, काँग्रेसने त्यावरील दावा अद्याप सोडलेला नाही. सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी, भाजपचा (BJP) पराभव हे मुख्य लक्ष्य ठेवावे आणि काँग्रेसला उमेदवारी द्यावी, अशी मागणी आमदार विश्‍वजित कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे

.१९ एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यात बदलाची अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फे देखील एक अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीत बदल झालाच नाही, तर पर्याय म्हणून ते अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल करतील. काँग्रेसच्या निर्णयावर बंडखोरीबाबतचा निर्णय अवलंबून असेल. त्याविषयी २२ एप्रिलच्या आधी निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.