काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष जोरात तयारी करताना पहावयास मिळत आहेत. नेतृत्वावरून अनेक पक्षांमध्ये मतभेद दिसून येतात. पण, आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे यंदा यशाची खात्री असल्याचा विश्वासही व्यक्त केला. विशाल पाटील यांनी खानापूर तालुक्यातील नागेवाडी, भाळवणी आणि लेंगरे जिल्हा परिषद गटाचा दौरा करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार संजय पाटील आणि भारतीय जनता पक्षाबद्दल सांगलीत प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
यावेळी आम्ही कसलीही कसर न ठेवता निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी पूर्णपणे चर्चा झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्षात आता कसलाही विसंवाद नाही. तसेच, मित्रपक्षही आमच्यासोबत आहेत, असा दावा पाटील यांनी केला.