सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना अटक…..

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग झाल्यामुळे एकच खळबळ माजली. रविवारी पहाटे झालेल्या या घटनेनंतर सतत नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने दोन्ही आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्यात. ताज्या अपडेट्सनुसार, त्या दोघांनाही चौकशीसाठी गुजरातमधून मुंबईत आणण्यात येत आहे. थोड्याच वेळात गुन्हे शाखेचे पथक आरोपींना घेऊन मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.गोळीबारानंतर सलमानसाठी त्याचे हितचिंतक आणि चाहते सर्वच काळजीत असून, अनेक जण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. या गोळीबारानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सरकारनेही या प्रकरणी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

रविवारी पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोघेही आरोपी वसई हायवे अर्थात मुंबई अहमदाबाद हायवेच्या दिशेने पळाले होते. एका रिक्षावाल्याला त्यांनी वसई हायवेचा पत्ता विचारला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींचा माग काढत होते. तसेच सायबर टीमकडून डंप डेटाही काढण्यात आला. दोन्ही आरोपी भुज येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याची पुष्टी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली.

त्यानंतर भुजच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आली. कारण स्थानिक पोलिसांना न कळवताच मुंबई पोलिस आरोपींना पकडण्यासाठी गेले असते तर ते आरोपी व्यावसायिक गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर गोळीबार होऊ शकतो, अशी शंका होती. त्यामुळेच पोलिसांनी खबरदारी घेत गुजरातमधील स्थानिक पोलीसांचे पथक सोबत घेतले. तर गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक भुजला पोहोचले. त्यानंतर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करून मुसक्या आवळल्या.