निंबाळकर, राम सातपुतेंसाठी फडणवीस आज सोलापुरात! शरद पवारांचा दौरा रद्द

सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धैर्यशील मोहिते-पाटील तर भाजपतर्फे विद्यमान खासदार रणजित नाईक-निंबाळकर आणि सोलापुरातील उमेदवार आमदार राम सातपुते यांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल होणार आहेत.भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात दाखल होत आहेत तर मोहिते यांच्यासाठी शरद पवार यांचा ठरलेला दौरा अचानक रद्द झाला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे जुना पुणे नाका येथून मिरवणुकीने येऊन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू होईल.

ती छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक,चार हुतात्मा चौक, डॉ. आंबेडकर चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गे सात रस्ता असा मिरवणुकीचा मार्ग असेल.तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. ते लातूरच्या विमानतळावर उतरतील. तेथून हेलिकॉप्टरने एमआयटी कॉलेजच्या मैदानावर त्यांचे आगमन होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार सोलापुरात येणार होते.

पण दौरा अचानक रद्द झाल्याने आता मोहिते- पाटील हे शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यांसमवेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.