सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यामुळे अनेकजण रात्री झोपताना घर उघडे ठेवतात. याच संधीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांकडून त्या घरांना लक्ष्य केले जात असल्याची स्थिती आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असून सध्या निवडणुकीच्या बंदोबस्तामुळे देखील गावोगावच्या रात्रगस्तीसाठी पोलिसांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पोलिस पाटलांच्या माध्यमातून गावागावात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.गतवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा उकाडा वाढत असून काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते.
गावागावातील अनेक कुटुंब दरवाजा उघडा ठेवून झोपतात. अशा घरांवर पाळत ठेवून चोरट्यांकडून त्याठिकाणी चोरी, घरफोडी केली जात असल्याची स्थिती आहे. चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढत असताना देखील अनेकजण घरात मौल्यवान वस्तू ठेवत आहेत. मोठी रोकड देखील घरात ठेवतात असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बॅंकेत किंवा लॉकरमध्ये ठेवावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांना सध्या मनुष्यबळाअभावी गावागावात रात्रगस्त अशक्य असल्याने पोलिस पाटलांच्या माध्यमातून नागरिकांना सावध केले जात आहे. पोलिस पाटील सध्या पोलिसांच्या कामाचा भार हलका करीत आहेत ही वस्तुस्थिती आहे.