माणगंगा नदीतून बेसुमार वाळू उपसा! कारवाई करण्याची मागणी

दिघंची येथे माणगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. याबाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरू असल्याने माण नदीपात्राची चाळण झाली आहे. दिघंची- पंढरपूर रस्त्यावर माण नदीवर मोठा पूल आहे. या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे.

रात्रभर बेसुमार वाळू उपसा केला जात असताना महसूल विभागाला याची कल्पनाच नाही. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे माण नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून त्यातून वाळू उपसा केला जात आहे.
सध्या या दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी माणगंगा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे वाळू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. रात्रभर वाळू उपसा करण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे.

तसेच या माणगंगा नदीतील वाळू उपसा केल्याने भविष्यात नदीत पाणी आल्यास ते पाणी साचून राहणार नाही. त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार आहे.
दिघंची येथे बेकायदेशीर उपसा केलेल्या वाळूचा पुरवठा करण्यासाठी आता बैलगाडीचा वापर केला जात आहे. बैलगाडीने वाळू पुरवठा हा नवीनच फंडा पाहावयास मिळत आहे.