वाळवा तालुक्यातील वशी गाव हे वारकरी संप्रदायातील आहे. या गावात जैन समाजाची दोन कुटुंबे आहेत. बारा वर्षांतून होणारा हा महोत्सव सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. वाळवा तालुक्यातील वशी येथे १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात २८ एप्रिल ते ४ मेपर्यंत पंचकल्याण महोत्सव होणार आहे. याचदरम्यान ग्रामदैवत हनुमान यात्रा दि. २५ व २६ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे ही यात्रा पूर्णपणे शाकाहारी करण्यात येणार आहे. गावाची यात्रा परंपरेने मांसाहारी होत होती. पंचकल्याण महोत्सवाच्या अनुषंगाने ही यात्रा पूर्णपणे शाकाहारी करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
पंचकल्याण महोत्सव आणि ग्रामदेवतेची यात्रा एकाचवेळी येण्याचा योगायोग यावर्षी आला आहे. या योगायोगाचे औचित्य साधून धार्मिक भावनेच्या उदात्त हेतूने गावाने यात्रेसंदर्भात हा एकमुखी निर्णय घेतला आहे. गावाच्या पारंपरिक यात्रेत वर्षानुवर्षे होत असणाऱ्या मांसाहाराला छेद देऊन पंचकल्याण महोत्सवामुळे धार्मिकतेची भावना यात्रा काळात जतन करण्याचा हा फार मोठा निर्णय आहे. हा निर्णय धार्मिकदृष्ट्या इतर गावांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, असे पंचकल्याण महोत्सव समिती सदस्य शांतिनाथ पाटील यांनी सांगितले.