भरधाव मोटारीच्या (Car Accident) धडकेमुळे काल (बुधवार) रात्री येथे झालेल्या तिहेरी अपघातात युवा बॅडमिंटनपटू (Badminton Player) वरुण रवी कोरडे (वय २२, रा. उदयसिंगनगर) जागीच ठार झाला. महावीर महाविद्यालयासमोर हा थरार घडला.
भरधाव मोटारीने कसबा बावडा ते महावीर महाविद्यालयादरम्यान (Mahaveer College) आणखी काही वाहनांना ठोकरल्याचे समजते. धडक देणाऱ्या मोटारीचा चालक ऋषिकेश बाबूराव कोतेकर (वय ४०, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) गंभीर जखमी झाला आहे. तो बेधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
पोलिसांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. घटनास्थळी गर्दी झाली होती. ‘जीएसटी इंटेजिलन्स’ असा फलक लावलेली मोटार रात्री साडेदहाच्या सुमारास कसबा बावड्याकडून शहरात येत होती. या मोटारीने महावीर महाविद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या दोन मोटारींना जोरदार धडक दिली. याचवेळी मागून येणारी दुचाकी या गाड्यांवर आदळली. ही दुचाकी वरुण चालवित होता.
त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यातील एक मोटार कोल्हापुरातून कऱ्हाडकडे निघाली होती. त्यातील लोक जोतिबा दर्शन करून कसबा बावडामार्गे शहराबाहेर जात होते. अपघातात या तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघातस्थळी गर्दी झाली. त्या दरम्यान पोलिस तेथे दाखल झाले. एका मोटारीतील चालक निघून गेला. धडक देणाऱ्या मोटारीच्या जखमी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत सीपीआरमध्ये दाखल केले.
याच मोटारीने कसबा बावड्यातून कोल्हापूरकडे येताना चार ठिकाणी धडक दिल्याची एकच चर्चा घटनास्थळावरील गर्दीमध्ये होती. गर्दीमुळे पोलिसांना अपघातग्रस्त वाहने बाजूला करता येणे मुश्कील झाले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठ्या उगारत गर्दी पांगवली. घटनास्थळाचे दृश्य विदारक होते.
सीपीआरमध्ये मृत तरुण व जखमी आणल्याची माहिती मिळताच अनेकजण तेथे आले. मृत तरुणाची ओळख पटवणे मुश्कील झाले होते. मित्रांमुळे पोलिसांनी वरुणची ओळख पटविली. त्या दरम्यान वरुणचे आईवडीलही रुग्णालयात आले होते; मात्र त्यांना पोलिसांनी या घटनेची माहिती तातडीने दिली नाही. अन्य नातेवाईक आल्याची खात्री होताच आई-वडिलांना वरुणच्या दुर्दैवी मृत्यूबाबत सांगण्यात आले. त्यावेळी आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
वरुण अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी
अपघातातील वरुण शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता. तो बॅडमिंटनपटू होता. तो मित्राला कसबा बावड्यात सोडून घरी परतत येत होता, त्यावेळी अपघात झाला.
चालकाची स्थिती संभ्रमित करणारी
‘जीएसटी इंटेजिलन्स’ असा फलक असलेली मोटार ऋषिकेश कोतेकर (वय ४०, रा. शिवाजी पेठ) चालवत होता. रात्रीच्यावेळी अधिकारी गाडीत नसताना तो मोटार कोठे घेऊन निघाला होता, अशी चर्चा घटनास्थळी होती.
आई-वडिलांची घालमेल
वरुणचे आई-वडील सीपीआर आवारात आले होते. वरुणबाबत माहिती द्या, अशी आर्जव दोघेही पोलिसांना करीत होते. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर ओळख पटली. तोपर्यंत दोघांचीही घालमेल सुरू होती.
काय घडले
- महावीर महाविद्यालयाजवळ भरधाव मोटारीची तीन वाहनांना धडक
- या वाहनांच्या मागून येणारी दुचाकी अपघातग्रस्त मोटारींवर वेगाने आदळली
- दुचाकी चालविणारा वरुण याचा जागीच मृत्यू
- धडक दिलेल्या मोटारीच्या पाठीमागे ‘भारत सरकार’ असा उल्लेख