कोल्हापूर जिल्ह्यात ड्रोनच्या घिरट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर जिल्ह्यात टोप, दानोळी, नरंदे, शिरोली, पडळसह काही ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. अचानक सुरू असलेल्या या ड्रोनच्या घिरट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी पोलिसांनी प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. सरकारी काम, खासगी ड्रोन की चोरट्यांच्या शोधासाठी कोणी ड्रोन उडवत आहेत का? याची माहिती घेतली जात आहे.

येत्या दोन दिवसात या प्रकाराची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.जिल्ह्यात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरी होत असल्याच्या अफवा असल्याने काही गावांत तरुणांनी गस्तही सुरू केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी, सरकारी कामासाठी काही ठिकाणी माहिती घेतली जात आहे का, काही ठिकाणी खासगी ड्रोन उडवले जात आहेत का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सर्वसामान्यांच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारी ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसत आहेत.

ड्रोन उडविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आणि महापालिकेचा परवाना सक्तीचा आहे.रात्रीच्या वेळी घरावर फिरणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून घरात सोने किती आहे, याची चाचपणी केली जात आहे, अशी अफवाही रहिवाशांच्यात आहे. ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोरी केली जात असल्याचा संशयही रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने काहीजण संध्याकाळी सात वाजताच घरातील दिवे बंद करून झोपत असल्याची ग्रामीण भागात स्थिती आहे.